कोल्हापुरात सासूच्या निधनाचा धक्का बसल्यानं सुनेची आत्महत्या

कोल्हापुरातील धक्कादायक बातमी

Updated: Mar 11, 2019, 05:11 PM IST
कोल्हापुरात सासूच्या निधनाचा धक्का बसल्यानं सुनेची आत्महत्या

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सासूचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने सुनेने आत्महत्या केली आहे. मालती लोखंडे यांचा एका आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. सांगली जिल्ह्यातील बागणी गाव येथील लोखंडे परिवार मागील 50 वर्षापासून कोल्हापुरातील आपटेनगरमध्ये राहत आहे. मालती लोखंडे यांच्या निधनामुळे घरात दु:खाचं वातावरण होतं. मालती यांच्या पार्थिवाजवळ पती मधुकर लोखंडे आणि मुलगा संदीप बसले होते. सासूच्या निधनामुळे शुभांगी यांना धक्का बसला होता. सासू आणि सुनेमध्ये आई आणि मुलीसारखं नातं होतं.

इमारतीच्या टॅरेसवरुन शुभांगी यांनी उडी मारली. याआधी शुभांगी यांनी देवघरात जावून सासूला भस्म लावला. त्यानंतर स्वत:ला देखील भस्म लावला. जेथून शुभांगी यांनी उडी मारली तेथे देखील भस्म आढळला. त्यामुळे हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. तर शुभांगी यांचा मृत्यू पाय घसरल्याने झाल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. 

पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी म्हटलं की, आपटेनगर भागात कॅन्सरग्रस्त असलेल्या सासूच्या मृत्यूमुळे सुनेने घराच्या टॅरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढची चौकशी केली जाईल.

मधूकर लोखंडे यांनी म्हटलं की, 'घरात भक्तीमय वातावरण असतं. सून अनेक देवतांची उपासना करते. देवघरातून भस्म आणून सूनेने सासूला लावलं. त्यानंतर घरात भस्म शिंपडत सून घराच्या बाहेर गेली. काही वेळेतच सुनेच्या ओरडण्याचा आवाज आला.'

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x