'डेस्टिनेशन रामदेगी' वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पहिली पसंती

चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून माया केली आहे. ताडोबाच्या परिघात असलेला रामदेगी धबधबा सध्या पर्यटकांनी फ़ुलून गेला आहे.

Updated: Jul 30, 2017, 11:55 PM IST
 'डेस्टिनेशन रामदेगी' वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पहिली पसंती  title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया,  चंद्रपूर : मॉन्सून बरसला की तरुणाई आणि  निसर्गप्रेमींना खुणावतो तो कोसळणारा पाऊस आणि फेसाळ धबधबे. चंद्रपूर जिल्ह्यावर निसर्गाने भरभरून माया केली आहे. ताडोबाच्या परिघात असलेला रामदेगी धबधबा सध्या पर्यटकांनी फ़ुलून गेला आहे.

'डेस्टिनेशन रामदेगी' वर्षा सहलीसाठी निघणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती ठरला आहे. 

चंद्रपूरातील हा देखणा रामदेगीचा धबधबा... घनदाट जंगलातील रामदेगी धबधबास्थळी पोचताच डोळ्यापुढे येते तो धरणीने नेसलेला हिरवाकंच शालू. काही थोडक्या पायऱ्याचा चढ पार केला की आपल्याला खुणावतात ती  छोट्या छोट्या झऱ्याची आनंदस्थळे. 

अगदी जुलैच्या प्रारंभापासून रामदेगी परिसर पर्यटकांनी फुलून गेला असतो.  वर्षा सहलीसाठी पोचलेल्या पर्यटकांच्या चमूना चढण चढून आल्यावर खुणावणारा धबधबा पाहिला की आनंदाला उधाण येते. 

यंदा सरासरीपेक्षा पाऊसकाळ कमी आहे. याचा परिणाम रामदेगी धबधब्याच्या खळाळत्या सौंदर्यावर देखील पडला आहे. मात्र यामुळे धोका कमी असल्याने पर्यटकांचे लोंढे सध्या रामदेगीकडे वळत आहेत. घनदाट जंगलातला ,मात्र सहज पोहचण्याजोगा धबधबा अनुभवण्यासाठी रामदेगी हे मान्सून फेवरीट स्पॉट ठरला आहे.