श्रीवर्धन, दिवेआगार किनारपट्टीला 'निसर्ग' धडकलं

अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात 

Updated: Jun 3, 2020, 03:10 PM IST
श्रीवर्धन, दिवेआगार किनारपट्टीला 'निसर्ग' धडकलं  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : किनारपट्टी भागात प्रचंड नुकसान करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेलं आणि मंगळवारपासूनच मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात दहशत निर्माण करणारं Cyclone Nisarga 'निसर्ग' चक्रीवादळ अखेर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. 

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू परिघ ६० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली.हे वादळ किनाऱ्यावर धडकत असतेवेळी लँडफॉल अर्थात वाऱ्याचा वेग हा प्रतितास १०० किलोमीटर इतका होता. 

एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?  

 

सध्याच्या घडीला वादळाचा प्रवास उरण रोखानं सुरु आहे. 

पाहा वादळाचा प्रत्यक्ष प्रवास 

चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वादळी वारे या भागात वाहू लागले. वाऱ्याचा जोर इतका होता, की येथे अनेक अमारतींवर असणारे पत्रे उडाले. मोठमोठे वृक्ष मुळासह उन्मळून पडले. पाहता पाहता पावसाचा जोर वाढला आणि समुद्रातून येणारी प्रत्येक लाट किनारा ओलांडून तिचं रौद्र रुप पाहायला मिळालं.

सध्या ठाणे आणि मुंबईच्या दिशेनं या वादळाची वाटचाल सुरु आहे. शिवाय येत्या काही तासांमध्ये वादळाची तीव्रता पाहता येणार आहे. परिणामी बुहतांश भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्याच्या धर्तीवर मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासांमध्ये हे वादळ मुंबईच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर नेमकी काय परिस्थिती उदभवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.