मुंबई / पालघर / रायगड : निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू-आगार गावातील ७० जणांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे. आज अलिबागजवळ निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांचे स्थलांतरण केले आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यात उद्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे. तसेच सध्या एनडीआरएफच्या दोन टीम पालघरमध्ये दाखल आहेत. विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश ही देण्यात आलेत.
चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातल्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या ४ तालुक्यातली समुद्र काठालगत वसलेल्या जवळपास २२ गावांना या निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या २२ गावांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यास अंदाजे जवळपास २१०८० इतकी लोकसंख्या बाधित होऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे योग्यती खबरदारी घेण्यात येत आहे.
NDRF teams conducted evacuation of population in very early morning hours of 03/06/2020 at Koliwada, Alibaug, Maharashtra: NDRF Director General SN Pradhan. #CycloneNisarga pic.twitter.com/nFF9VXC6VL
— ANI (@ANI) June 3, 2020
वसई तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या पाचूबंदर(वसई), चांदीप, सायवन, कामण, ससूनवघर, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगावं बुद्रुक अशा १२ गावांना निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर पालघर तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या सातपाटी, जलसारंग, उच्छेळी, मुरबे आणि दांडी अशा ५ गावांना देखील या चक्रीवादळा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डहाणू तालुक्यातल्या किनाऱ्यालगत असलेल्या डहाणू , नरपड, चिखले आणि आंबेवाडी अशा ४ गावांना निसर्ग चक्रीवादळा चा फटका बसण्याची शक्यता आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पालघर जिल्ह्यातल्या समुद्रकाठी असलेल्या चक्रीवादळामुळे बाधीत होणाऱ्या गावांमधल्या बाधीत नागरिकांचं स्थलांतरण निवारा छावण्यांमध्ये करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितलं आहे. निवारा छावनीत निवारा देण्यात आलेल्या नागरिकांना पिण्याचं पाणी, अन्न आणि आरोग्य सेवा तसंच औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यात उद्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत. पालघर आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या रासायनिक आणि अणूऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे.
या चक्रीवादळामुळे सर्व मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत आणण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर सोपविण्यात आली आहे. जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.