प्रशांत परदेशी, झी मीडिया,
Nandurbar Tree Fall On Car: नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसामध्ये चालत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तर दोन जण जखमी झाले आहेत.
तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसापमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील तळोदा चिनोदा रस्त्यावर चालत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर गाडीतील दोघेजण जखमी झाले आहेत. राजेंद्र मराठे असं मयत तरुणाचे नाव आहे.
आर्टिका गाडीतून राजेंद्र मराठे हे इतर दोन जणांसोबत तळोद्याकडून चिनोदा गावाकडे जात होते. त्याचवेळी गाडीवर अचानक झाड कोसळल्याने राजेंद्र मराठे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरे दोन जण जखमी झाले आहेत.
गाडीवर झाड पडल्याची घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र झाड मोठे असल्याने जेसीबीच्या साह्याने झाडाला बाजू करण्यात आले. एकूण जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांवरील जीर्ण झाडांचा प्रश्न या घटनेतून समोर येत आहे.
गुजरात राज्यमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विक्रीला आलेल्या बाजार समितीत भुईमुगाच्या शेंग, मका, आणि अनेक पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. आधी साठवलेला कृषी मालही ओला झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पथाऱ्यांवर सुकायला ठेवलेली मिरचीही ओली झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाजार समितीतील कृषी माल झाकायला आणि शेडमध्ये ठेवायलाही वेळ मिळाला नाही. अनेक ठिकाणी लग्नासाठी टाकण्यात आलेला मंडप देखील उडाले आहेत. त्यामुळे लग्नाला आलेल्या वऱ्हाडींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. वादळ वाऱ्यासह सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक घरांचे नुकसान झाले असून. अनेक रस्त्यांवर झाडेदेखील उन्मळून पडली असल्याने वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आता पाऊस कमी झाला असला तरी वादळामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
मान्सून लांबणीवर पडला असला तरी राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. राज्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, येत्या तीन ते चार तासांत पाऊस अधिक जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.