'वंदे भारत' आता अधिक सुस्साट, मुंबई-शिर्डी अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, कसं ते पाहा

CSMT-Shirdi Vande Bharat Express Train: मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे अंतर आता आणखी कमी होणार आहे. शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसबाबात एक मोठी अपडेट आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2023, 02:15 PM IST
'वंदे भारत' आता अधिक सुस्साट, मुंबई-शिर्डी अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, कसं ते पाहा title=
CSMT Shirdi Vande Bharat Express Train Speed Set To Increase To 130 Kmph

Vande Bharat Express Mumbai: महाराष्ट्रात सध्या पाच वंदे भारत ट्रेन सुरू असून या एक्स्प्रेसमुळं प्रवासाचे अंतर तर कमी होत आहे त्याचबरोबर प्रवासाचा वेळदेखील वाचतोय. प्रवाशांच्या वेळेत अधिक बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग आता वाढवणार आहे. इगतपूरी ते मनमाड दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसचा स्पीड वाढणार आहे. 

मध्य रेल्वे इगतपुरी-मनमाड मार्गावर CSMT-शिर्डी वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 130 किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. इगतपुरी आणि शिर्डीदरम्यानचे अंतर हे 125 किमी इतके आहे. तर, सध्या 110 किमी प्रतितास वेगाने वंदे भारत एक्स्प्रेस धावते. मात्र, हे वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग वाढवल्याने प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. 

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने रेल्वे रूळांवर सुधारण्याचे काम सुरू केले आहे. एकदा हे काम संपल्यावर प्रवासाचा वेळ आणखी 30 मिनिटांनी कमी होईल. शिवाय, यामुळे इगतपुरी-भुसावळ मार्गाचा वापर करणाऱ्या इतर गाड्यांनाही मदत होईल आणि प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होईल.

दरम्यान, वंदेभारत सीएसएमटी - शिर्डी साईनगर वंदे भारत ट्रेनचे फेब्रुवारीमध्ये लोकार्पण करण्यात आले होते. मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावते. वंदे भारत ट्रेनमुळं वेळेची बचत होत असल्याने प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या 6 तासांत पार करता येते. 

कल्याण स्थानकांत थांबा मिळणार 

दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसची प्रवासी संख्या वाढण्यासाठी या ट्रेनला मुंबईत अतिरिक्त थांबा देण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीला जाणारी वंदे भारत 6 वाजून 15 मिनिटांनी सूटते. त्यानंतर या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड या स्थानकात थांबा मिळतो. त्याचदिवशी 11.40 वाजता ही गाडी शिर्डी स्थानकात पोहोचते. 

शिर्डीहून वंदे भारत ट्रेन 5.25 वाजता सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये रात्री 10.50 वाजता पोहोचते.