मेळघाटातील नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी

मेळघाटातील पर्यटन पुन्हा एकदा १ सप्टेंबर पासून सुरु झाले आहे.

Updated: Sep 17, 2020, 12:45 PM IST
मेळघाटातील नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांची गर्दी title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मागील पाच महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेले मेळघाटातील पर्यटन पुन्हा एकदा १ सप्टेंबर पासून सुरु झाले आहे. त्यामुळे पर्यटकांनाबरोबरच छायाचित्रकारांचीही गर्दी मेळघाटात झाली आहे. विदर्भातील शेकडो पर्यटक मागील काही दिवसात मेळघाटला येऊन गेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मेळघाटचा नजरा त्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

पावसाळा आला की दरवर्षी जून महिन्यापासून मेळघाटात पर्यवरण प्रेमींची भ्रमंती सुरु होते. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या या मेळघाटातील सौंदर्य सृष्टी, तिचा नजरा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक येत असतात. मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. आजही येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत इथल्या लोकांचं जीवनमान कसं आहे. हे टिपण्याचा प्रयत्न देखील छायाचित्रकार करताना दिसतात. 

मेळघाटने हिरवा शालू पांघरलेला आहे. यावर्षीदेखील मेळघाटमध्ये दमदार पाऊस झाला असल्याने येथील सर्व धबधबे, नद्या, नाले, छोटी धरणे, पाणी प्रकल्प हे ओव्हर फ्लो झालेले आहेत. 

मेळघाट हे विदर्भाच काश्मीर म्हणून ओळखलं जातं. त्याच धरतीवर येथील सौंदर्य देखील फुलले आहे. त्यामुळे हे सौंदर्य टिपण्यासाठी छायाचित्रकार येत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील छायाचित्रकार धिरज भाकरे यांनी मेळघाटातील नयनरम्य आणि विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.