कुमारी माता, विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दाम्पत्यांना अटक

इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटीलकडून कुमारी माता आणि विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दोन दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय. 

Updated: Feb 10, 2018, 02:48 PM IST
कुमारी माता, विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दाम्पत्यांना अटक  title=

कोल्हापूर : इचलकरंजीतील डॉ. अरुण पाटीलकडून कुमारी माता आणि विधवा महिलांच्या बाळांना विकत घेणाऱ्या दोन दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय. 

अर्भकाची ७ ते ८ लाख रुपयाला विक्री

चंद्रपूर आणि मुंबईतील नेरुळ इथल्या दाम्पत्यांना अटक करण्यात आलीय. अर्भकाची तस्करी करून त्या अर्भकाची ७ ते ८ लाख रुपयाला विक्री करणाऱ्या इचलकरंजीमधील जवाहरनगर इथल्या डॉ. अरुण पाटीलला केंद्रीय पथकानं धाड टाकून रंगेहाथ पकडल होतं.

बाळांच्या विक्रीत डॉक्टरचा सहभाग 

यानंतर चंद्रपूर आणि नेरुळ इथं शिवाजीनगर पोलिसांची पथकं रवाना झाली होती. चंद्रपूर इथले अनिल चहांदे आणि प्रेरणा चहांदे या दाम्पत्याचा पोलिसांनी कसून तपास केला. तपासात चहांदे दाम्पत्याने अरुण पाटीलकडून बाळ खरेदी केल्याचं मान्य केलं. 

मध्यस्थी करणारा डॉक्टर कोण?

यानंतर पथकाने मुंबईतील नेरुळच्या अमोल सवाई आणि आरती सवाई या दाम्पत्याची चौकशी केली. त्यांनीही अरुण पाटीलकडून बाळ खरेदी केल्याचं मान्य केलंय. या प्रकरणात एका डॉक्टरचं नाव समोर आलंय. त्यामुळे मध्यस्थी करणारा डॉक्टर कोण याचा पोलीस शोध घेतायत. दोन्ही दाम्पत्याकडून ताब्यात घेतलेल्या बालकांना कोल्हापुरातील बालकल्याण समितीकड सुपूर्द करण्यात आलंय.