कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात खास खबरदारी

महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज 

Updated: Mar 5, 2020, 10:44 AM IST
कोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात खास खबरदारी  title=

पंढरपूर : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेले रूग्ण आढळल्यानंतर देशभरात भीतीच वातावरण आहे. महाराष्ट्र अद्यापही कोरोनाच्या लागणपासून दूर आहे. असं असलं तरीही महाराष्ट्र सरकारने कोरोनाशी दोन हात यंत्रणा सज्ज केली आहे. असं असताना आता पंढरपूरातही कोरोनापासून लांब राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. आणि कोरोना व्हायरसचा संसर्ग सार्वजनिक ठिकाणी होण्याची शक्यता अधिक आहे.

म्हणून पंढरपूरचं श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर कोरोनापासून दूर राहावं म्हणून दिवसातून सहा ते सात वेळा स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज मोठ्या संख्येनं भक्तगण येत असतात. त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत भाविकांनी मास्कचा वापर करणार असल्याचे फलकही लावण्यात येणारेत. दरम्यान कोरोनासंदर्भात काय काळजी घेतली जावी अशा आशयाचे फलकही लावले जाणार आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यातील यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती आरेग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलीय. कोरोनापासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कचा, औषधांचा राज्य सरकारकडे योग्य पुरवठा असल्याची माहिती  टोपे यांनी  दिली आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शाळांमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात एकत्र आणणं टाळा असे निर्देश, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं देशभरातल्या शाळांना दिले आहेत. तसंच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेवर ध्यान देण्याची सूचनाही आरोग्य मंत्रालयानं केली आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्वरीत डॉक्टरकडे जाण्याचं तसंच  हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे.

हरियाणातल्या सिरसा शहरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलाय. या संशयित रुग्णाला सिरसा शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. १० दिवसांपूर्वीच हा रुग्ण इटली आणि रोममधून भारतात परतलाय. त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीये... त्या संशयित रुग्णाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील स्वतंत्र वार्डात दाखल करण्यात आलंय... हा २५ वर्षीय इंजिनिअर तरुण गेल्या वर्षभरापासून सौदी अरेबियातील बहारिनमध्ये एका नामांकित कंपनीत कामाला होता...  घरी नांदेडला आल्यानंतर त्याला ताप, थंडी, खोकला असा त्रास सुरू झाला...