मुंबई : देशात कोरोनाचा कहर कमी होताना दिसत असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरोनाचं थैमान सुरूच आहे. गेल्य़ा आठवड्याचा विचार केला, तरी महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 10.02 टक्क्यांवर आहे. पण हेच प्रमाण जर देशाचं पाहिलं, तर देशातला कोरोना पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के आहे.
राज्यात कोरोनाचे 7 हजार 863 नवे रुग्ण आज वाढले आहेत. दिवसभरात 54 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत 6 हजार 332 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनाचे 79 हजार 93 अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्याचा रिकव्हरी रेट 93.89 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसांत राज्यात 30 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात 849 रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या सुरूवातीपर्यंत 1 ते 2 हजाराच्या घरात आढळणारी नव्या रुग्णांची संख्या आता 7 ते 8 हजारावर पोहोचली आहे. आजची ताजी आकडेवारी पाहिली, तर 2 मार्चला राज्यात 7 हजार 863 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय आजची कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्याही 54 आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद केली जातेय. महाराष्ट्रापाठोपाठ केरळ, गोवा, पंजाब, तामिळनाडू, गुजरातमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतोय. केरळमध्ये ४.५७ टक्के तर गोव्यात ३.९० टक्के कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्याही 79 हजार 093 आहे. देशात 40 हजाराहून सक्रीय रुग्ण असणारी केवळ 2 राज्य आहेत, ज्यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 75 टक्के वाटा हा याच 2 राज्यांचा आहे.
एकीकडे नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख महाराष्ट्रात वाढता दिसत असला, तरी रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दिलासादायक आहे. महाराष्ट्रातला कोरोना रिकव्हरी रेट हा 93.89 टक्क्यांवर गेला आहे. लसीकरणाची मोहीमही वेगानं राबवली जातेय. 1 मार्चपासून देशभरात 60 वर्षांवरील ज्येष्ठ आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना कोरोनाची लस द्यायला सुरूवात झाली आहे.