कोरोनाची ब्याद, मूळव्याधीचा त्रास, घरच्या घरी उपाय ठरतायत घातक

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चुकून करु नका हे उपाय, नाहीतर होऊ शकतो मूळव्याध

Updated: Jun 23, 2021, 06:30 PM IST
कोरोनाची ब्याद, मूळव्याधीचा त्रास, घरच्या घरी उपाय ठरतायत घातक  title=

अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे काढे, अँटीबायोटिक्स आणि व्हिटामिनच्या गोळ्यांमुळे आता मुळव्याधीची समस्या जाणवू लागलीये. मुळव्याधीवर उपचार करणाऱ्या एका रुग्णालयात 10 एप्रिल ते 20 मे या काळात मूळव्याधीचे 704 रुग्ण आले. यापैकी तब्बल 481 जण कोरोना झाल्यामुळे किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काढे किंवा व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणार होते. 

अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतायत. द्रवणशिल नसलेल्या गोळ्या घेतल्यानं मूळव्याधचा त्रास उद्भवतोय. तर आयुर्वेदिक काढे हे शरिरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे हायपर अॅसिडिटी, जळजळ, आतड्यांमध्ये वेदना होतात. तसंच गरम काढे प्यायल्यानं अतिसार किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेही मूळव्याधीची शक्यता वाढते. 

द्रवणशिल नसलेल्या व्हिटॅमिन गोळ्यांमुळे फिशर किंवा मूळव्याधीचा त्रास उद्भवतो असं मुळव्याध सर्जन डॉ. संदीप अगरवाल यांनी म्हटलंय. कोरोना काळात ही औषधे अती प्रमाणात घेतली गेली. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच व्हिटॅमिन युक्त औषधांचे सेवन करावं असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

मूळव्याध किंवा फिशरचा त्रास सुरू झाल्यास दिवसात किमान 4 लिटर पाणी प्यावे. किमान 20 मिनिटे चालावे. प्रोटीन युक्त अन्न खाणे टाळावे. फायबर युक्त अन्न तसेच फळे खावीत असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.

त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी काढे आणि गोळ्या जरूर घ्या... पण त्याचा अतिरेक मात्र करु नका.