राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा विस्फोट , 52 जण पॉझिटिव्ह

शाळा सुरू करण्याचा निर्णय अति घाईचा ठरलाय का? या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा धुमाकूळ... विद्यार्थ्यांसह शिक्षकही बाधित

Updated: Dec 26, 2021, 09:58 PM IST
 राज्यातील या जिल्ह्यातील विद्यालयात कोरोनाचा विस्फोट , 52 जण पॉझिटिव्ह title=

अहमदनगर : देशासह महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्याच दरम्यान नगरमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर मधील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील कोरोना रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. 

नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवोदय विद्यालय परिसर कॅन्टोनमेंट झोन जाहीर केला. 3 दिवसांपूर्वी 19 जण कोरोना बाधित झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात आणखी 32 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

नवोदय विद्यालयामध्ये 460 विद्यार्थी आणि 51 शिक्षक आणि कर्मचारी आहेत. सध्या 307 विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत. तर 48 कोरोना बाधीत विद्यार्थ्यांना उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

राज्यात एकूण रुग्ण किती?

एकीकडे ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे चिंता वाढली असून लॉकडाऊन होणार का? याची धाकधूक लागली आहे. वर्षा अखेरीस पुन्हा कोरोना वाढताना दिसत आहे. राज्यात 24 तासात 1 हजार 648 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनचे एकूण 31 रुग्ण आढळले आहेत.

धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 12 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. मुंबईत तब्बल 922 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.