अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सर्दी झाल्यानं कोणाचा मृत्यू झालाय हे तुम्ही कधी ऐकलंय का?.... पण हे ऐकायची आता तयारी मात्र आता ठेवा... येत्या काळात अगदी साधा ताप आणि सर्दीही तुमच्या मरणाला कारणीभूत ठरु शकते. आणखी तीस वर्षांनी म्हणजे २०५० मध्ये माणूस मरण्यासाठी कँन्सरसारख्या दुर्धर आजाराची गरज लागणार नाही. माणूस साध्या सर्दी तापानंही मरु लागेल.
याला कारण सध्या सुरु असलेला एंटिबायोटिक्सचा बेसुमार वापर. साधी सर्दी झाली तरी आपण एंटिबायोटिक्स घतो. डॉक्टर हाताला चांगला गुण आहे हे दाखवण्यासाठी रुग्णाला गरज नसताना थेट एंटिबायोटिक्सचा डोसच देतात. पण हे डोस रूग्णाच्या मृत्यूला आमंत्रण देतात.
व्हायरल आजारासाठी कारणीभूत ठरणारे जंतू त्या एंटीबायोटिक्सला सरावलेत. याचा परिणाम म्हणजे औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या एंटिबायोटिक्सची परिणामकारकता दिवसेंदिवस लोप पावत आहे.
कोणत्या रुग्णांना कोणत्या परिस्थितीत एंटिबायोटिक्स द्यावी यासाठी नियमावली आखण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काही वर्षांत सर्दीसारख्या आजारानं माणूस मेला हे ऐकण्याचीही तयारी तुम्हालाही ठेवावी लागेल.