छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण, आता मात्र.... राज्यपाल कोश्यारी असं का म्हणाले?

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे म्हटलं आहे.

Updated: Nov 19, 2022, 02:49 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण, आता मात्र.... राज्यपाल कोश्यारी असं का म्हणाले? title=
(फोटो सौजन्य - ANI)

Governor Bhagat Singh Koshyari : आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आता पुन्हा एकदा एक विधान केले आहे. राज्यपालांच्या या विधामुळे सध्या जोरदार चर्चा सुरुय. औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधान केले आहे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना डी. लिट ही पदवी देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन गडकरी, शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक एकाच मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे, असे म्हटलं आहे.

काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?

"आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला तुमचा फेव्हरेट हिरो कोण असे विचारायचे तेव्हा कुणाला सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरु चांगले वाटायचे. पण मला असं वाटतंय की जर तुम्हाला कोणी विचारलं की तुमचा आदर्श कोण तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळून जातील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील," असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

"तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर शरद पवार आणि नितीन गडकरी हे व्हिजनरी आहे. दोन्ही नेते व्हिजनरी आहेत. ते काम केल्याशिवाय मागे हटत नाही," असंही राज्यपाल म्हणाले.

दरम्यान, याआधीही गुजराती व राजस्थानी लोकांनी पैसे काढून घेतले तर मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाही आणि देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, असेही वक्तव्य राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर राज्यपालांनी या वक्तव्याबाबत माफी मागितली होती.