जरांगेंचा सोडणार नाही हा इशारा ऐकून कपाळावर हात मारत भुजबळ म्हणाले, 'अशी अनेक लोक माझ्या...'

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या सभेत छगन भुजबळांचा थेट उल्लेख न करता कठोर शब्दांमध्ये टीका केली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2023, 04:51 PM IST
जरांगेंचा सोडणार नाही हा इशारा ऐकून कपाळावर हात मारत भुजबळ म्हणाले, 'अशी अनेक लोक माझ्या...' title=
पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळांचं विधान

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जाहीर सभेमधून राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पैसा कुठून येतो असा प्रश्न विचारणाऱ्या छगन भुजबळांवर टीका करताना जरांगेंनी अजित पवारांचा उल्लेख करत छगन भुजबळांना समज द्यावी असंही म्हटलं. याचसंदर्भात भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी जरांगेवर टीकास्त्र सोडलं आहे. आपण मागे लागलो तर काही खरं नाही असं आव्हान भुजबळांना देणाऱ्या जरांगेंच्या प्रतिक्रियेवर भुजबळांनी उत्तर दिलं आहे. 

जरांगे भुजबळांबद्दल काय म्हणाले?

पुढे बोलताना जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावरुन उपस्थित होत असलेल्या प्रश्नाला कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं. छगन भुजबळ यांनी आज होत असलेल्या सभेसाठी 7 कोटी खर्च आल्याचा संदर्भ देत जरांगेंनी शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. "आता नवा एक फॉर्म्युला आला आहे. त्याला बोलत नव्हतो बरं का मी. त्यो एक दिवस म्हणाला, आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही. माझ्या एकट्याच्याच मागे लागले. मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हटल्यावर आपण बोलायला बंद केलं. काल पुन्हा फडफडायला लागलं. काल म्हणतंय, 7 कोटी रुपये खर्च आला. आरं काय वावरं घेतलं का आम्ही येडपटा?" असं जरांगेंनी म्हणताच उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

लोकांचे पैसे खाल्ल्याचा आरोप

छगन भुजबळांच्या कथित वक्तव्यांचा संदर्भ देत मनोज जरांगेंनी, "100 एकर विकत नाही घेतलं. हे सभेसाठी घेतलं आहे भाड्याने. इथल्या शेतकऱ्याने फुकट दिलं आहे. गाड्या माझ्या मराठ्याने स्वत: पदराने लावल्यात. त्यो म्हणतो लोकं 10 रुपये पण देत नसतील. अरं तुला देत नसतील. तुला लोक का देत नसतील पैसे ते पण सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचेच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तुझ्यावर धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्ष बेसन खाऊन आतून (तुरुंगातून) आला. आम्हाला शिकवतोय! हे पैसे कुठून आले?" असा प्रश्न विचारला.

अजित पवारांनी समज द्यावी अशीही मागणी

अजित पवारांचा उल्लेख करत जरांगेंनी छगन भुजबळांना उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी असंही म्हटलं. "ते म्हणतंय 7 कोटी खर्च आला. कोटीच पहिल्यांदा ऐकतोय आम्ही. आम्ही 20-20 रुपयांचं पेट्रोल टाकून मोटरसायकल चालवणारे. 7 कोटी केव्हा बघावं. काय म्हणावं एवढ्या मोठ्या नेत्याने त्याला समजलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तुमच्या पक्षाचं आहे. समज द्या. नाहीतर मी असा मागं लागेन. माझ्या नादाला लागल्यावर मी सोडतच नाही," असं जरांगे म्हणाले.

भुजबळ डोक्याला हात लावत म्हणाले...

जरांगेंनी केलेल्या याच आरोपांवरुन छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर छगन भुजबळांनी कपाळाला हात लावत उत्तर दिलं. पत्रकारांनी, "तुम्ही लोकांचे पैसे खाल्ले. अजितदादांनी तुम्हाला समज द्यावी. मी मागे लागलो तर तुम्हाला सोडणार नाही असं ते म्हणाले," असा उल्लेख करत प्रश्न भुजबळांना विचारला. त्यावर उत्तर देताना भुजबळांनी, "अशी अनेक लोक माझ्या मागे लागतातच. त्यात तू अजून एक. त्याच्यात काय फरक पडणार आहे मला," असं म्हणत निघून गेले.

छगन भुजबळ यांनी सर्वच नेते मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं असं म्हणत आहेत. माझंही तेच म्हणणं असल्याचं म्हणाले.