रत्नागिरी : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. बेस्ट समिती शिवसेनेची, मुंबई महापालिकेत सत्ता शिवसेनेची, सरकारमध्ये शिवसेना मग लोकांना त्रास देण्याचं काम का करताय? सर्व सत्ता ताब्यात असताताना बेस्टबाबत निर्णय का होत नाही, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. संप मिटवा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाटत नाही, म्हणूनच ते लक्ष देत नाहीत, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपाचा तिढा सोडविण्याची इच्छा शिवसेना आणि भाजपची नाही. जर हा प्रश्न सोडवायचा असता तर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले असते. मात्र, ते लक्ष घालत नाही. तसेच मुंबई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. स्थायी समिती शिवसेनेकडेच आहे. तर संघटनेत यांचे लोक मग संपाबाबत तोडगा का काढला जात नाही, हेच समजत नाही. याचा अर्थ यांना संपावर तोडगा काढयचा नाही. लोकांना का त्रास दिला जात आहे. हा त्रास शिवसेना आणि भाजपवालेच देत आहेत, असा थेट हल्लाबोल भुजबळ यांनी रत्नागित आले असता केला.
दरम्यान, आज या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने संप मिटवण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. तसेच संपाबाबत हस्तक्षेप करण्यासही न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे या संपावर सरकार आणि प्रशासनाला तोडगा काढवा लागणार आहे. दरम्यान, उद्या सकाळी राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास आणि परिवहन सचिव यांच्या त्रिसदस्यीय समितीने बैठक घेऊन बेस्ट संपाबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला केली. त्यामुळे आता काय तोडगा निघतो याची उत्सुकता आहे. बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.