बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या मुलींकडे लक्ष द्या अस सांगितलं होतं. त्यामुळे मुंडेंवरील प्रेमापोटी मी आज प्रीतम मुंडे यांच्या भेटीसाठी आलो आहे. मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. बीड लोकसभा निवडणुकीत परळी इथे छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपण भाजपाचे सहयोगी सदस्य आहोत त्यामुळे मोदींच पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला.
'गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाआधी त्यांच्याशी भेट झाली होती तेव्हा त्यांनी एकदा बोलताना माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा असं म्हटलं होतं. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांच्या पाठीमागे मी भावाप्रमाणे खंबीरपणे उभा आहे.' असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसले आहेत. बीडमध्ये प्रितम मुंडेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतली आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. आपण मुंडेंचा प्रचार करणार नसलो तरीही आपण भाजपसोबतच असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मेटेंच्या या भूमिकेमुळे मुंडे भगिनींची चांगलीच अडचण झाली आहे. आता विनायक मेटेंची समजूत काढणे हे भाजप पक्षश्रेष्ठींसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे निवडणुकीच्या रणमैदानात नसले तरी टक्कर धनंजय मुंडे विरूद्ध पंकजा आणि प्रितम अशीच आहे. काटे की टक्कर असताना गोपीनाथ मुंडेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले विनायक मेटेंनी तिरकी चाल खेळल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी मेटेंनी पंकजा मुंडेंशी असहकार पुकारला आहे. बीडमध्ये मुंडे भगिनींचा प्रचार करणार नाही अशी भूमिका विनायक मेटेंनी घेतली आहे.