चोरीला गेलेला ७३ लाखांचा मुद्देमाल चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना मिळवून दिला

पालकमंत्र्यांकडून चंद्रपूर पोलिसांचं कौतुक

Updated: Jun 11, 2019, 01:21 PM IST
चोरीला गेलेला ७३ लाखांचा मुद्देमाल चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना मिळवून दिला title=

आशीष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : सामान्य नागरिकांचे चोरी झालेले दागिने, बाईक आणि इतर मौल्यवान वस्तू पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक सोहळ्यात नागरिकांना मिळवून दिले. हा सोहळा आज चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यामध्ये 73 लाख रुपयांच्या वस्तू नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्यात. गेल्या दोन महिन्यात चोरी गेलेल्या वस्तूंपैकी 32% वस्तू मुद्देमालासह परत करण्याचा विक्रम चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. 

चोरी झालेली आणि हरवलेली वस्तू सन्मानपूर्वक परत मिळणे हल्ली सहज होत नाही. मात्र चंद्रपूर पोलिसांनी ही किमया करून दाखवली आहे. एकटे पोलीस पारदर्शी आणि इमानदार होऊन भागणार नाही. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रत्येकाने समाज बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. समाजातील सज्जनशक्ती पोलिसांच्या पाठीशी उभी राहिल्यानंतर समाजातील दुर्जन शक्तीचा उपद्रव मूल्य कमी होते असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला आहे. हा बदल चंद्रपूर पोलिसांनी एक कार्यक्रमात अधोरेखित केला. 

एक दोन नव्हे तर तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ज्यात मोबाईल, दुचाकी, सोन्याचे दागिने आदींचा समावेश होता. त्यांच्या मूळ मालकांना तो परत केला. या सोहळ्यात पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी खुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. गेल्या काही महिन्यात ज्यांच्या वस्तू हरवल्या आहेत असे सामान्य नागरिक आपल्या आप्तेष्टांसह वस्तू परत मिळवण्यासाठी आनंदाने उपस्थित झाले होते. 

७३ लाख ८५३ रुपयांचा मुद्देमाल यावेळी जनतेला परत करण्यात आला. यामध्ये जवळपास १८ लाखाचे मोबाईल होते. तर चंद्रपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांमध्ये पकडलेल्या चोरीतील साडेदहा लाख रुपयांच्या सोन्याच्या मूल्यवान वस्तूंचा देखील समावेश होता. प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी काही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या आनंदाश्रुना वाट मोकळी करत पोलिसांचे आभार मानले.

'आपल्या चोरीला गेलेल्या वस्तू आपल्याला परत मिळेल की नाही याबद्दलची कायम साशंकता असते. पोलिसांकडे गेल्यानंतरही तो ऐवज परत मिळेल काय ही किचकट प्रक्रियेमुळे उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. मात्र चंद्रपूर पोलिसांनी विश्वास आणि पारदर्शी कार्य करत अगदी विक्रमी वेळात हा मुद्देमाल लोकांना जाहीर कार्यक्रमात परत केला. याचा आपल्याला आनंद आहे.' असे कौतुकाचे उदगार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी काढले. 'हरवलेल्या वस्तूला किंमतीमध्ये मोजता येत नाही. त्यामागे आपली भावना जोडलेली असते. त्यामुळे हरवलेली वस्तू सापडण्यासारखा दुसरा आनंद नाही. चंद्रपूर पोलिसांनी हा आनंद जनतेला मिळवून दिला ही कौतुकास्पद बाब,' असल्याचे ते म्हणाले. आपली स्वतःची सायकल चोरीस गेली. ती मिळाल्यावर प्रत्यक्ष घरी आणण्यासाठी किती हेलपाटे घालावे लागले याचा किस्सा त्यांनी आवर्जून सांगितला.

हरवलेली वस्तू सहजासहजी परत मिळत नाही आणि ते परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे जे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळेच  नकारात्मक भावना निर्माण होते. हरवलेला ऐवज परत करण्याच्या अशा कार्यक्रमांमधून पोलिसांप्रती जनतेचा विश्‍वास वाढतो व पारदर्शी कार्यक्रमाला जनतेकडून प्रतिसाद मिळतो अशी भावना पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. 

या कार्यक्रमात हरविलेली गाडी बघून तिला स्पर्श करून, दागिना हातात घेऊन, आपलाच मोबाईल पुन्हा पुन्हा हाताळून बघणारे शेकडो नागरिक अनुभवायला मिळाले. हरविलेली वस्तू तक्रार केल्यावर एवढ्या सहजतेने पुन्हा हाती लागते यावर आश्चर्य व्यक्त करत नागरिक परतले.