कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांची जवळीक सर्वश्रृत आहे. त्यामुळंच चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलीक यांचा मनापासून प्रचार करणार का याबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवरच चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. माझ्या पत्नीनं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी युती धर्मानुसार आपण शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाडिकांसोबतची मैत्री बाजूला ठेवू आणि शिवसेनेच्याच उमेदवाराला निवडून आणू असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुडमध्ये शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
स्वबळाच्या घोषणेनंतर युती झाल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. युतीमुळे अनेक इच्छूक उमेदवारींची गोची झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास अनेक जण तयार नाहीत. त्यामुळे युती झाली असली तर बंडखोर आणि नाराज नेत्यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान शिवसेना आणि भाजप पुढे असणार आहे. युतीच्या उमेदवाराला अनेकांनी छुपा विरोध सुरु केला आहे. अनेक नेते हे नाराज आहेत.
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली.
चंद्रपुरातही अशीच काही नाराजी आहे. वरोरा विधानसभेचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर शिवसेना सोडण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करून धानोरकर चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २-३ दिवसांत धानोरकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं आहे. युती झाल्यानं धानोरकर नाराज आहेत. युती झाल्यास शिवसेनेकडून लढणार नसल्याचं धानोरकरांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलं होतं. काँग्रेसकडून लोकसभा लढवून हंसराज अहिर यांना आव्हान देण्याची धानोरकर यांची तीव्र इच्छा आहे.