औरंगाबाद : केंद्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती पाहणी करेल त्यांनतर आपल्याला मदत हाती पडेल, अशी अपेक्षा असणाऱ्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उच्चपद्स्थ समितीने उत्तर महाराष्ट्र पाहणी दौऱ्याची सुरवातच अंधारातून केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय.
औरंगाबाद येथून दुष्काळाची पाहणी केल्यानंतर समितीचे अधिकारी सायंकाळी सहानंतर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोल्हाइत इथे पोहोचले. मात्र पाहणी करण्यासाठी गेलेल्या भागात अंधार पडल्यानंतर या समितीने नेमकं काय पाहिलं याचं मोठं आश्चर्य आहे, अंधारातच पाहणी उरकण्यात आल्यानं शेतक-याचं भवितव्यही अंधारातच दिसतेय.
केंद्रातील दुष्काळ पाहणी पथकाचा दुष्काळ दौरा सुरू झालाय. केंद्रातून आलेल्या अधिकाऱ्यांनी तीन भागात विभागणी झालीय. पथकाकडून राज्यातील नाशिक, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीची पाहणी करणार आहेत. केंद्रीय सहसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकानं अहमदनगर जिल्ह्यापासून पाहणी दौरा सुरू केला.
शेवगाव तालुक्यातील कापूस, तूर यासह रब्बी पिकांची पाहणी या पथकानं केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिण्याचं पाणी शेतीतील पीक त्यांची स्थिती आणि पशुधनाची परिस्थिती याबाबत चौकशी केली. हे पथक अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी जामखेड कर्जत या तालुक्यातील दुष्काळ स्थितीची पाहणी करून सोलापूरला जाणार आहेत.