बोहल्यावर चढण्याआधी तीन नवरदेवांनी बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानावेळी वर्धा आणि नागपुरातल्या तीन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा अधिकार बजावला.

Updated: Apr 11, 2019, 04:26 PM IST
बोहल्यावर चढण्याआधी तीन नवरदेवांनी बजावला मतदानाचा अधिकार title=

नागपूर :  लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानावेळी वर्धा आणि नागपुरातल्या तीन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा अधिकार बजावला. वर्धा जिल्ह्यातल्या सावल आणि रसुलाबाद तर रामटेकच्या नगरधन गावातील नवरदेवांनी लग्नाआधी मतदान केलं. 

वर्ध्याच्या रसुलाबादच्या संजय सावरकर याचंही आज लग्न होतं. त्यांनी लग्नासाठी रवाना होण्याअगोदर वऱ्हाड्यांसह मतदान केलं. सावलच्या किशोर मानमोडेंनी आधी लोकशाही मग लग्न या सूत्रानं पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. त्यांची वरात मतदान केंद्राजवळ थांबवण्यात आली. 

नवरदेवानं मतदान केलं त्यानंतर किशोर मानमोडे लग्नासाठी नागपूरला रवाना झाले. तर नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक मतदारसंघातल्या नगरधनच्या मुनेश्वर माहुले यांनीही लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. 

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह आहे. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. महाराष्ट्रात आज विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान होत आहे.