राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा, राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा

By Election News: राज्यातील ग्रामपंचायत आणि रिक्त असणाऱ्या सरपंचपदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 मे रोजी मतदान होणार आहे.   

Updated: Apr 6, 2023, 07:36 PM IST
राज्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा, राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा title=

By Election News: राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 18 मे 2023 रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.
   
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. 25 एप्रिल ते 2 मे 2023 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाहीत. 3 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 19 मे 2023 रोजी मतमोजणी होईल.