विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : ऑनलाईन खरेदी करताना सावधान... फ्लिपकार्ट ऑनलाईन पोर्टलवरून मोबाईल खरेदी करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र या तरुणाला एक वीट तब्बल नऊ हजारांना पडलीय. आता तुम्ही म्हणाल एक मातीची विट नऊ हजारांची कशी? असं काय आहे यात? तर ही साधीसुधी विट नाही, मोबाईल विकत घेतल्यावर त्याच्या जागेवर ही वीट या तरुणाला मिळालीय.
औरंगाबादच्या हर्सुल परिसरात राहणारे गजानन खरात यांनी 'फ्लिफकार्ट' या ऑनलाईन पोर्टलवरून नऊ हजारांचा मोबाईल मागवला. त्याचं बिल क्रेडीट कार्डनं अदा केलं. सात दिवसांनी पार्सल त्यांना मिळालं आणि आत मोबाईल असेल या आनंदानं त्यांनी हे पार्सल उघडलं आणि त्यात निघाला विटेचा तुकडा...
त्यांनी लागलीच कुरीअर कंपनीला फोन केला, मात्र त्यांनी थेट हात झटकले. त्यानंतर त्यांनी फ्लिपकार्ट कंपनीला सुद्दा फोन केला. मात्र त्यांनीही म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही.
फसवणूक झाली असल्यानं गजानन यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तरूणाची झालेली ही फसवणूक अनेकांना धडा देणारी आहे... ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहा हीच अपेक्षा...