बैलाने गिळलं १.५० लाखाचं मंगळसूत्र, आणि...

कुठे घडला हा अजब प्रकार 

Updated: Sep 19, 2019, 12:50 PM IST
बैलाने गिळलं १.५० लाखाचं मंगळसूत्र, आणि... title=

मुंबई : नुकताच पोळा हा सण साजरा झाला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पोळा हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या सणानिमित्ताने बैलांची पूजा केली जाते आणि त्यांचे आभार मानले जातात. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी एखाद्या देवाप्रमाणे पूजलं जातं. 

या पूजेदरम्यान बैलांसमोर घरातील मंडळी सोने-चांदीची आभूषण ठेवून सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील वाघपुर गावांत एक अजबच प्रकार घडला आहे. एका कुटुंबाने पूजेसाठी ठेवलेलं मंगळसूत्र चक्क बैलाने गिळलं आहे. 

तर झालं असं की, शेतकरी बाबूराव शिंदे यांची पत्नी पूजेदरम्यान बैलांची पूजा करत होती. त्यावेळी त्यांना आपलं मंगळसूत्र बैलाच्या माथ्यावर लावायचं होतं. पण घाईगडबडीत त्यांनी हे मंगळसूत्र बैलाच्या खाण्याच्या ताटात ठेवलं. 

याच दरम्यान दिवे देखील गेले. तेव्हा मेणबत्ती आणण्यासाठी शिंदे यांची पत्नी घरात निघून गेली. बाहेर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, बैलाच्या नैवेद्याचं ताट पूर्ण रिकामं होतं. त्यामधील पुरणपोळी आणि मंगळसूत्र दोन्ही गायब होते. 

शिंदेच्या पत्नीने शिंदे यांना आवाज दिला आणि घडलेला सारा प्रकार सांगितला. बैल मंगळसूत्र चघळताना त्यांना दिसला, असंख्य प्रयत्न करून देखील बैलाने मंगळसूत्र काही सोडले नाही. घडलेल्या प्रकारानंतर शिंदे कुटुंबीय प्रत्येकवेळी बैलाच्या शेणात मंगळसूत्र सापडतं का हे पाहत होते. पण तसं काहीच घडलं नाही. त्यानंतर या दोघांनी पशुवैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला. 

डॉक्टरांना सगळा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तपासणी केली आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बैलाच्या पोटात अडकलेलं मंगळसूत्र बाहेर निघालं.