Buldhana LokSabha Election 2024 : बुलढाणा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते मातृतीर्थ सिंदखेडराजा... संत नगरी शेगाव... लोणारचं जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं सरोवर... ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक वारसा लाभलेला बुलढाणा जिल्हा... २००९ पर्यंत राखीव असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला भाजपाचे सुखदेव नंदाजी काळे यांचा अपवाद वगळता जिल्ह्याबाहेरचे पाहुणे खासदारच या मतदारसंघाला लाभले. काँग्रेसचे बाळकृष्ण वासनिक आणि मुकुल वासनिक, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे सगळेच पाहुणे खासदार.. त्यामुळं विकासाच्या नकाशावर बुलढाणा कोसो दूरच राहिलं.
खामगाव - जालना रेल्वेमार्गाचं भिजत घोंगडं वर्षानुवर्षं पडूनच आहे. जिगाव प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प अजून कागदावरच रखडलाय. लोणार आणि सिंदखेडाराजाचा विकास आराखडा लाल फितीच्या कारभारात अडकलाय. खरंतर मुकुल वासनिक आणि आनंदराव अडसूळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी मिळाली. बुलढाण्याचे खासदार केंद्रीय मंत्री झाले. मात्र त्यांच्या मंत्रीपदाचा बुलढाणावासियांना फारसा लाभ झालाच नाही, हेच कटू वास्तव आहे.
बुलढाणा... शिवसेनेचा बालेकिल्ला
2009 मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यापासून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 28 हजार मतांनी पराभूत केलं. तर 2014 मध्ये राष्ट्रवादीचे कृष्णराव इंगळे यांचा तब्बल दीड लाख मतांनी पाडाव केला. तर 2019 मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या शिंगणेंना त्यांनी सव्वा लाखाच्या फरकानं पराभवाचं पाणी पाजलं. मात्र, आता राजकीय समीकरणं बदलली आहेत.
प्रतापराव जाधवांना कोण देणार टक्कर?
शिवसेना एकसंघ राहिलेली नाही. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद एकत्र केली तर ती महाविकास आघाडीपेक्षा भारीच म्हणावी लागले. प्रतापराव जाधव हे महायुतीचे तगडे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकरांचं नाव चर्चेत आहे. त्याशिवाय जयश्री शेळके आणि रविकांत तुपकर देखील ठाकरे गटाकडून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. रविकांत तुपकरांनी निर्धार यात्रा काढून आधीच मोर्चेबांधणी केलीय.
दरम्यान, प्रतापराव जाधवांसारख्या तीन टर्म खासदाराला आव्हान देणं ही सोप्पी बाब नाही. गद्दारी गाडा असं भावनिक आवाहन करून भागणार नाही. तर जाधवांना टक्कर देऊ शकेल, असा तगडा पर्याय उभा करणं हीच महाविकास आघाडीसाठी पहिली कसोटी ठरणार आहे. एवढंच नाही तर बुलढाण्यात जिंकायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना स्वत: मैदानात उतरावं लागणार आहे.