मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा जिल्हा रुग्णालय शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे हळवं झालं. उपचार घेत असलेली आई मृत्यू पावल्यावर तिच्या लहानग्या लेकाने मोठ्यांदा हंबरडा फोडला. मृत्यूला नेहमीच जवळून पाहणाऱ्या रुग्णालयातल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीही या ४ वर्षांच्या चिमुरड्याच्या रडण्याने गहिवरले
बुलढाणा जिल्ह्यातल्या सैलानी इथल्या महिलेच्या असाध्य आजारावर रुग्णालयात मागच्या २ महिन्यांपासून उपचार सुरू होते. तिच्यासोबत होता तो तिचा ४ वर्षांचा निष्पाप मुलगा. मात्र उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर न कळत्या वयातला तिचा लेक तिला बिलगून जीवाच्या आकांताने रडला.
मुलाला पोरकं करून आणि सोबतीला असंख्य प्रश्न ठेवून या पोराची आई त्याला सोडून निघून गेली. त्याला यापुढे कुशीत कोण घेणार? त्याचे लाड कोण करणार? त्याची काळजी कोण घेणार? या प्रश्नांनी रुग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचारी सुन्न झाले. ४ वर्षांच्या या मुलाला इतके दिवस हॉस्पिटल प्रशासनाने सांभाळलं होतं. आता समाजातल्या दानशूर व्यक्तींनी या मुलाची काळजी घेण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आलं आहे.
माणूस मेला तरी माणुसकी टिकून आहे. हे या मुलाच्या बाबतीत पुन्हा एकदा महाराष्ट्र दाखवून देईल का? सर्वस्व हरवलेल्या या लेकराला मायेची उब मिळेल का? हा खरा प्रश्न आहे.