लातूर : शासकीय टेलिफोन कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनामुळे आमरण उपोषण सुरु केले आहे. लातूरच्या बीएसएनएल महाप्रबंधकाच्या मुख्य कार्यालयापुढे ०३ जून पासून ८५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. जानेवारी महिन्यापासून ०५ महिन्यांचे या कर्मचाऱ्यांचे वेतन बीएसएनएलच्या गाजियाबाद येथील साई कम्युनिकेशन या कंत्राटदाराने थकविले आहे. त्यामुळे ८५ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
थकीत वेतनाबाबत बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदाराकडे सतत पाठपुरावाही करण्यात येत होता. पण असे करूनही वेतन दिले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरुवात केली आहे. हे कर्मचारी बीएसएनएलच्या सेवेत कायम होतील या आशेने गेल्या १८ वर्षांपासून तोकड्या वेतनावर काम करीत आहेत. मात्र हे वेतनही थकीत ठेवल्यामुळे आता जगावे का मरावे ? असा सवाल हे कर्मचारी करीत आहेत. दरम्यान या कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे अगोदरच डबघाईस गेलेले बीएसएनएलची सेवा आणखीनच विस्कळीत झाली आहे.