सात जन्म राहिले दूर; विवाहितेनं लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात मृत्यूला कवटाळलं

अवघे 3 महिने विवाहाला झाले असताना नववधूने अचानक जीवनप्रवास संपविल्याची घटना शनिवारी (दि. 30) रात्रीच्या सुमारास घडली. रविवारी (दि. 31) दुपारी तिच्या कुटुंबीयांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी हलविला.

Updated: Aug 2, 2022, 11:15 AM IST
सात जन्म राहिले दूर; विवाहितेनं लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात मृत्यूला कवटाळलं title=

नाशिक :  अवघे 3 महिने विवाहाला झाले असताना नववधूने अचानक जीवनप्रवास संपविल्याची घटना शनिवारी (दि. 30) रात्रीच्या सुमारास घडली. रविवारी (दि. 31) दुपारी तिच्या कुटुंबीयांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी हलविला.

मात्र तो प्रवेशद्वारावरच ठेवून जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले आणि त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, गौरी भावसार हिचा तीन महिन्यांपूर्वीच सचिन भावसार याच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. पंचवटी परिसरातील रामवाडी येथे गौरीचे माहेर आहे. आणि जुने नाशिकमधील खैरे गल्लीतील दीक्षित चाळ हे तिचे सासर होते. गौरी भावसारने  शनिवारी रात्री सासरी राहत्या घरी लाकडी आढ्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

हा प्रकार सासरच्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला जिल्हा गौरी भावसार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रविवारी सकाळच्या सुमारास  तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी गौरीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातून ताब्यात घेत घरी नेला. 

तेथून अंत्ययात्रा पंचवटीतील अमरधाममध्ये आणण्यात आली. या ठिकाणी मृतदेह सरणावर ठेवण्यापूर्वी प्रवेशद्वारावरच ठेवून कुटुंबीयांनी संताप व्यक्त करण्यास सुरवात केली.

जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा आक्रमक पवित्राच तिच्या कुटुंबीयांनी घेतला. यावेळी शोकाकुल कुटुंबीयांची पोलिसांनी समजूत काढली आणि त्यानंतर कुटुंबीयांनी  मृतदेह अमरधाममध्ये घेऊन जात अंत्यसंस्कार केले पोलिसांनी  सासरच्या काही लोकांना चौकशीसाठी  ताब्यात घेतले. यावर अधिक तपास पंचवटी पोलीस करत आहे.