अजित मांढरे झी मिडीया मुंबई : केमिकल कंपन्यांवर बोगस छापा घालून उद्योजकांकडून कशी खंडणीवसुली केली जाते, याचा धक्कादायक व्हिडिओच झी 24 तासच्या हाती लागलाय... विशेष म्हणजे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव सांगून ही बोगस कारवाई करण्यात आली... नेमका काय आहे हा प्रकार, पाहूयात...
बोईसर तारापुर एमआयडीसीतील ही श्री साई इंटरप्रायजेस केमिकल कंपनी. ५ जुलैला सकाळी ११ वाजता अचानक या कंपनीत दीपक सांडव आणि अरुण लाड नावाच्या दोन व्यक्ती धडकल्या. 'आम्ही मंत्रालयातून आलोय. राज्यमंत्रांनी कंपनीची तपासणी करायला पाठवलंय,' असं सांगून त्यांनी छापा घातला. हा प्रकार पाहून कंपनी मालक पराग जरदोश यांनी जिल्हा दक्षता समितीचे सदस्य जगदीश धोडी आणि टीमाचे सदस्य महेंद्र सिंग यांना बोलवून घेतलं. तेव्हा हे सरकारी अधिकारी नसल्याची बाब समोर आली.
महेंद्र सिंग आणि धोडी यांनी तत्काळ बोईसर पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. मानसिंग पाटील नावाचे पोलीस अधिकारी तिथं आले... त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली असता ते बोगस अधिकारी असल्याचं उघड झालं... पण त्या दोघांपैकी दीपक सांडवनं एक फोन पोलीस अधिका-याच्या हातात दिला. फोनवर राज्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला, असं त्यानं पाटील यांना सांगितलं... त्यावेळी काय बोलणं झालं, ते पाहा...
पोलीस कारवाई सुरू असतानाच सांडवनं पुरवठा निरीक्षक अधिकारी एस. डी. तडवी यांना बोलवून घेतलं. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सचिव विनोद लाडे यांनी कारवाईसाठी आपल्याला फोन केला होता, अशी कबुली तडवी यांनी दिलीय. तडवींनी श्री साई एन्टरप्रायजेस कंपनीतून केमिकल जप्त केले. पण डीवायएसपी दर्जाच्या अधिका-यानं केमिकल जप्त करावं, असा नियम असताना एका कनिष्ठ पुरवठा अधिका-यानं ते चुकीच्या पद्धतीनं सील केल्याचा आरोप कंपनी मालकानं केलाय.
ते केमिकल चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पण प्रयोगशाळेचा अहवाल मात्र अजून आलेला नाहीये... याज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा या प्रकरणातला कथित सहभाग, दोघा बोगस अधिका-यांनी घातलेला छापा आणि ते बोगस असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरही पोलिसांनी दाखल न केलेला गुन्हा या सगळ्याच बाबी संशयास्पद आहेत. याप्रकरणी कंपनी मालकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून झाल्या प्रकाराची तक्रार केलीय. पण पुढं काहीच कारवाई झालेली नाही. थेट राज्यमंत्र्यांच्याच नावानं केमिकल कंपनीवर छापा टाकला जाण्याचा हा प्रकार धक्कादायक तर आहेच. शिवाय त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतायत...