पालघर : डहाणू समुद्र किनाऱ्यावर जवळपास ३५-४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली एक बोट समुद्रात बुडालीय. हे सर्व विद्यार्थी के. एल. पोंडा संस्थेचे अकरावी-बारावीचे विद्यार्थी आहेत.
या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय तर ३२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती हाती येतेय...
बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालायात उपचारासाठी हलवण्यात आलंय. दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे. उरलेल्या जवळपास समुद्रात बेपत्ता ८ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. खासगी बोटीतून हे विद्यार्थी फिरायला निघाले होते.
डहाणू समुद्र किनाऱ्यावरून जवळपास दोन नॉटिकल अंतरावर समुद्रात ही घटना घडलीय. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झालेत. दमणवरून रेस्क्यू बोटी मागवण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सेल्फी काढण्याच्या नादात ही घटना घडल्याचं समजतंय. बोट चालवणाऱ्या व्यक्तीनं मात्र समुद्रात उडी घेत आपले प्राण वाचवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिलीय.
समुद्रकिनाऱ्यावर मुलांच्या पालकांची, स्थानिकांची आणि बघ्यांची गर्दी दिसतेय.