भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी

shailesh musale Updated: Apr 9, 2018, 04:38 PM IST
भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या हिंसाचारात हत्याकांडानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शिवसेना नेते आपल्या मागणीवर ठाम आहेत.

चौकशीसाठी पोलिसांचं विशेष पथक स्थापन

हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलंय. अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून केडगावात दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. संतापलेल्या शिवसैनिकांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत रास्तारोको केला. काल संपूर्ण अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. औरंगाबादमध्ये शवविच्छेदन करून हे मृतदेह नगरला आणण्यात आले. त्यानंतर रात्री या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार अरूण जगतापांच्या अटकेची मागणी

आमदार अरूण जगताप यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पुन्हा एकदा केली. त्यासाठी रात्री पुन्हा रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर केडगावात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या अंत्यसंस्कारांनंतर आज अहमदनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अरुण जगताप यांचे पुत्र संग्राम जगताप यांना यापूर्वीच अटक करण्यात आलीय.