Raosaheb Danve: दोनदा आमदार, सलग पाच वेळा खासदार आणि केंद्रात मंत्री राहिलेले भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा मात्र या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. रावसाहेब दानवे यांच्या पराभवानंतर भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. मात्र, अलीकडेच रावसाहेब दानवेंनी केलेले एक वक्तव्य चांगलंच गाजतंय. पराभवानंतर मला चांगली झोप लागली, असं दानवेंनी म्हटलं आहे. लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. माझ्या मतदारसंघात मी कोट्यवधी रुपयांची कामे केली. आयसीसी कॉलेज देशात तीनच आहेत. एक भुवनेश्वर, जालना आणि मुंबई. चांगली कामे करुनही माझा लोकसभेत पराभव झाला. याचं कारण मी स्वतःलाच विचारतो. असं कसं झालं?, असं दानवेंनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात की, आत्तापर्यंत राज्यात 5 वर्षे आणि देशाच्या राजकारणात 10 वर्षे घातले आत्तापर्यंत राज्यात 5 वर्षे आणि देशाच्या राजकारणात 10 वर्ष घातले. त्यात मला जन सन्मान यात्रा काढता आली नाही म्हणून माझा पराभव झाला त्यामुळे आता मला माझ्या मतदारसंघात जन सन्मान यात्रा काढल्याशिवाय पर्याय नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.
मी आत्तापर्यंत एकदाही सोशल मीडियावरील कमेंट वाचली नाही. जो कमेंट वाचको त्याला झोप येत नाही. माझी बायकोपण मला सांगते असं असं झालं तिला म्हणतो नको सांगू मला झोपू दे शांत. ज्या दिवशी माझा निकाल लागला आणि माझा पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली. आणि सध्या मी चांगलं जीवन जगत आहे, असं दानवेंनी म्हटलं आहे.
लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांना विधानपरिषदेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, दानवेंनी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ संघटनेतच काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रावसाहेब दानवे यांना आता भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी संयोजक पदावर नियुक्ती केली आहे. पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली आहे. रावसाहेब दानवे लवकरच राज्याचा दौरा करणार असून सरकारच्या लोकांसाठी असणाऱ्या योजना घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी घेणार आहे. दानवेंनीच तशी माहिती दिली आहे.