मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले. मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे चित्रा वाघ यांच्या फोटोसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असताना आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर 15 दिवसांपूर्वी ACBकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ACBच्या चौकशीतून समोर आली माहिती
गुन्हा दाखल झाल्यानंतर किशोर वाघ यांच्या चौकशीत कोट्यवधीची बेहिशेबी संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किशोर वाघ हे मुंबईतील परेल इथल्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते.
5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आलं होतं. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
या चौकशीमध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची संपूर्ण माहिती, वारसाहक्काची मालमत्ता, खर्च इत्यादी बाबींचा सविस्तर तपास करण्यात आला. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचं आढळून आलं.
चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्यामुळे लाचलुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) आणि 13(1)E या कलमांतर्गत 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई गुन्हा दाखल केला आहे.
चित्रा वाघ यांच्या पतीची ही खुली चौकशी भाजपची राज्यात सत्ता असताना सुरू करण्यात आली होती. याच प्रकरणामुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची तेव्हा चर्चाही होती. एकीकडे आपल्या फोटोसोबत झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातून आणि दुसरीकडे पती किशोर यांच्यावर असलेला आरोप या दोन्हीमधून कसा मार्ग काढणार हे पाहाणं महत्त्वाच ठरणार आहे.