पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमात पैसे गुंतवताय? तर सावधान!

ऑनलाईन गेम कंपनीच्या नावाने कोट्यवधींचा गंडा, शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक

Updated: Jun 30, 2021, 09:26 PM IST
पैसे दुप्पट करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन माध्यमात पैसे गुंतवताय? तर सावधान! title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर : कोरोनाकाळात ऑनलाईन लुडो, कॅरम, क्रिकेटसारखे गेम खेळणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. अगदी हेच हेरून नागपुरातील एका भामट्यानं 'ई गेम एशिया' (e games asia online) या नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झटपट पैसे कमवता येईल असं अमिष सुदत्त रामटेके याने अनेक गुंतवणूकदारांना दाखवलं. अनेकांनी यात पैसेही गुंतवले, पण गुंतवणूकदारांचे पैसे घेवून हा भामटा फरार झाला. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर नागपूर आर्थिक गुन्हे शाखेनं सुदत्त रामटेकेला गोव्यातून अटक केली आहे. तपासात त्यानं शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचं पुढे येतंय.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढली. लॉकडाऊनमध्ये मोठं नुकसान झालेल्या लँडडेव्हलपर सुदत्त रामटेकेने ऑन लाईन गेम खेळण्यासाठी एक प्लॅटफार्म उपलब्ध करून देणारी कंपनी सुरु करत असल्याचं अनेकांना सांगितलं. पण सुदत्त रामटेकचा या माध्यमातून झटपट  पैसा कमवण्याचा इरादा होता. त्यांने लोकेश वाघमारे या आणखी एका व्यक्तिला हाताशी घेवून 'ई गेम एशिया' नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या संकेतस्थळावरून लुडो, कॅरम, क्रिकेट यासह अठरा विविध गेम खेळता येतील, आणि या प्लॅटफार्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या रक्कमेतील काही पैसा गुंतवणूकदारांना मिळेल असं गुंतवणूकदारांना सांगितलं. 

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्यानं गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यात दामदुप्पट रक्कम मिळेल असं अमीषही त्यांनी गुंतवणूकदारांना दाखवलं. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चेन सिस्टिम ठेवण्यात आली. अगदी 3 हजारांपासू 5 लाखांपर्यंत काही गुंतवणूकदारांनी या ऑन लाईन गेमिंग कंपनीत गुंतवणूक केली. सुरुवातील काही जणांना पैसै देवून सुदत्त रामटेकेने विश्वास संपादीत केला. मात्र, डिसेंबरनंतर 2020 नंतर अनेकांना पैसे न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं जाणवू लागलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर सुदत्तनं आपलं ऑनलाईन दुकान बंद करून पळ काढला. यानंतर गेल्या 4 महिन्यांपासून तो गोव्यात ऐशोआरमचं जीवन जगत होता. पण अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

याप्रकरणी आतापर्यंत 14 गुंतवणूकदारांनी सुमारे 86 लाखांची फसणवूक झाल्याची तक्रार केली असली तरी यामध्ये सुमारे किमान 200 गुतंवणूकदारांची  फसवणूक झाल्याची शक्यता नागपूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी महेंद्र अंभोरे यांनी व्यक्त केलीय. फसवणूक झालेले काही गुंतवणूकदार राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा इथले असल्याचंही अंभोरे यांनी सांगितलं आहे. तसंच फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहनही पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी केलंय. 

या निमित्तानं पुन्हा एकदा सोप्या पद्धतीन झटपट पैसा कमवण्याचा अमिषाला अनेक जण बळी पडल्याचं समोर आलं. यावेळी ऑनलाईन गेम प्लॅटफॉर्म कंपनीच्या माध्यमाची भुरळ गुंतवणूकदारांसमोर भामट्यांनी वापरली.