BJP ला धक्का! 'फडणवीसांना सांगून आलोय' म्हणत पक्ष सोडला; म्हणाले, 'तुतारी हाती घेतली तर..'

BJP Leader Leaves Party Likely To Join Sharad Pawar: आपल्याला घरातूनही या निर्णयासाठी पाठिंबा असल्याचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना या नेत्याने सांगितलं. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्यावाचा राजीनामा दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 23, 2024, 01:53 PM IST
BJP ला धक्का! 'फडणवीसांना सांगून आलोय' म्हणत पक्ष सोडला; म्हणाले, 'तुतारी हाती घेतली तर..' title=
भाजपाला मोठा धक्का

BJP Leader Leaves Party Likely To Join Sharad Pawar: कोल्हापूरमधील भारतीय जनता पार्टीचे नेते समरजित घाटगेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. समरजित घाटगेंनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी आपण पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सांगून पक्ष सोडत असून असं करायला हिंमत लागते असं म्हटलं आहे. 

एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला

"मला अभिमान आहे, तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मला  मिळत आहे. कागल भूमी शाहू महाराज यांची आहे. हेच दाखवून देण्यासाठी माझा प्रयत्न. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं समरजित घाटगे म्हणाले आहेत. बिना सत्तेचे तुम्ही टिकणार आहे का? असं सवाल समरजित घाटगेंनी समर्थकांना विचारला.  

25 वर्षे निधी मिळेल याची शाश्वती

दोन महिने निधी मिळणार नाही, पण पुढील 25 वर्षे निधी मिळेल याची शाश्वती मी देतो, असा विश्वास समरजित घाटगेंनी बोलून दाखवला. "2019 साली आपली तयारी नव्हती, पण आपण लढलो. घरात आईसाहेब यांनी देखील सांगत आहेत हातात तुतारी घ्या," असं समरजित घाटगे म्हणाले. तसेच आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याचंही समरजित घाटगे म्हणाले. "माजी आणि जयंत पाटील याच्या अनेक भेटी झाल्या आहेत. त्यांनी सांगितले विचार करा," असं सूचक विधान समरजित घाटगेंनी केलं आहे. 

तुतारी हाती घेतली तर

"तुतारी घेतली म्हणजे जिंकणार असं होणार नाही. आपल्याला राबवे लागणार. घरात बसून चालणार नाही. जर आपण तुतारी हातात घेतली तर आपल्याला उद्यापसून कामाला लागावे लागणार आहे," असंही समरजित घाटगेंनी म्हटलं आहे. या विधानावरुन ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. 

पक्ष सोडताना कळवलं

आपण पक्ष सोडताना वरिष्ठ नेत्यांना कळवल्याचं सांगितलं आहे. "मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस यांना सांगून आलो आहे. मला काही निर्णय घ्यावे लागेल हे मी त्यांना सांगितले आहे. गडकरी, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेकांना मी कल्पना दिली आहे. हे असं नेत्याला सांगून निर्णय घेण्यासाठी हिंम्मत लागते," असंही समरजित घाटगे म्हणाले. 

समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न

भारतीय जनता पार्टीकडून समरजित घाटगेंची समजून घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते पक्ष सोडण्यावर ठाम राहिले. त्यांनी सोशल मीडियावरुन भाजपासंदर्भातील बऱ्याच गोष्टी हटवल्या आहेत.