भीमा-कोरेगाव हिंसाचार : 'गौतम नवलखांचा 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध?'

पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे अरुणा पै यांनी हे आरोप केले 

Updated: Jul 25, 2019, 09:11 AM IST
भीमा-कोरेगाव हिंसाचार : 'गौतम नवलखांचा 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध?' title=

पुणे : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी आणि माओवादी विचारवंत गौतम नवलखा यांचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना 'हिजबुल मुजाहिद्दीन'शी थेट संबंध आहे, असा खळबळजनक आरोप राज्य सरकारच्या वकील अरुणा पै यांनी बुधवारी (24 जुलै) मुंबई हायकोर्टात केला आहे.गौतम नवलखा हे सन 2011 ते 2014 दरम्यान काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी आणि शकील बख्शी यांच्या संपर्कात होते, अशी माहितीही अरुणा पै यांनी कोर्टात दिली. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून हे प्रकरण उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे अरुणा पै यांनी हे आरोप केले आहेत.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांना आरोपी रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंग यांच्य लॅपटॉपमधून यासंबंधीचे पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हिजबुलकडून शस्त्रास्त्र, विस्फोटके आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी नक्षलींना तसेच माओवाद्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळते. या प्रकरणातील सर्व आरोपींना देशाविरोधात युद्धच पुकारायचे होते. असा आरोपही सरकारी वकील अरुणा पै यांनी केला. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या इतर आरोपींनाही शहरी आणि ग्रामीण नक्षलवादाशी संबंधित जबाबदारी ठरवून दिलेली होती, अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली.

'त्या' नक्षली हल्ल्याच्या कटातही सहभाग ?

छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सन 2017 मध्ये झालेल्या नक्षलवादी हल्याच्या कटातही गौतम नवलखा यांचा सहभाग होता. या समूहाचे नवलखा सदस्य होते. पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे, असे यावेळी सांगण्यात आले. या हल्ल्यानंतरच्या सत्यशोधन समितीमध्ये नवलखा सहभागी होते. मात्र, त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली होती, बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेचेही ते सदस्य होते, असे आरोपही सरकारतर्फे करण्यात आले आहेत.