रत्नागिरी : पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार भास्कर जाधव यांची जाहीर नाराजी दिसून आली. गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
#BreakingNews । रत्नागिरी दौऱ्यावर पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आमदार भास्कर जाधवांची जाहीर नाराजी दिसून आली । गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली https://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/balQA9m3HH
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 17, 2020
व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आल्यानंतर आमदार भास्कर जाधव व्यासपीठावर आले आणि मागील रांगेत बसले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार विनायक राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भास्कर जाधव यांनी खासदार विनायक राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थित सर्वांच्या नजरेत आली.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांना मंत्रिमंडाळात स्थान न मिळाल्याने उघडपणे मीडियासमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मला देण्यात आलेले आश्वासन पाळले गेले नाही. तेव्हापासून भास्कर जाधव हे नाराज आहेत. मात्र, आज जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर ही नाजारी पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे शिवसेनेत आजही नाराजी आहे, असे उघड झाले आहे.
दरम्यान, गणपतीपुळे येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. कोकणाबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय. तुम्हाला जे पाहिजे ते मी करून देईन. जेवढा निधी लागेल तेवढा देईन. मी आकडा कधी लावलेला नाही, आकडा कधी खेळलोलो नाही आणि आकडा कधी बोललेलो नाही, हे आकडेबाज सरकार आपले नाही, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. यावेळी पुढे ते म्हणाले की आपण जे करतो ते मनापासून, हृदयापासून करतो, जे जे इथं गरजेचं आहे ते मी करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.