Bharat Jodo Yatra : सरकारला 'भारत जोडो यात्रा' रोखावी वाटत असेल तर... Rahul Gandhi यांचं आव्हान

सावरकरांच्या बाबतीत सत्य आहे तेच बोललो, Rahul Gandhi आपल्या वक्तव्याव ठाम, Bharat Jodo Yatra देश जोडण्यासाठी, जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आहे.

Updated: Nov 17, 2022, 06:22 PM IST
Bharat Jodo Yatra : सरकारला  'भारत जोडो यात्रा' रोखावी वाटत असेल तर... Rahul Gandhi यांचं आव्हान title=

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही, असं असतानाही जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे. 

'देशात द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा'
भारत जोडो यात्रेदरम्यानची राहुल गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला इथं पार पडली. देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत (Kanyakumari to Kashmir) ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात (Bharat Jodo Yatara in Maharashtra) या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि  यातून मला खूप काही शिकायला मिळालं असं राहुल गांधी यांनी सांगितलं. महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा (Wardha) इथेच राहण्याचा विचार का केला असावा? याचं उत्तर मला या विदर्भाच्या (Vidarbha) भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस (Congress) विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे.

सावरकर यांच्याबद्दल चुकीचं बोललो नाही
सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले, हे सांगताना राहुल गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेलं पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्ष तुरुंगात डांबले होते पण त्यांनी ब्रिटीश सरकारला (British Government) पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. हा या दोन विचारधारेतील फरक आहे. एक गांधींची विचारधारा तर दुसरी सावरकरांची.

जनतेचा आवाज ऐकण्यासाठी यात्रा
देश तुटलेला नाही तर मग भारत जोडो पदयात्रेची गरज काय असा प्रश्न भाजपा (BJP) करत आहे.पण गेल्या 8 वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलेलं आहे.जनतेचा आवाज ऐकला जात नाही, शेतकरी, तरुण, कष्टकरी यांचा आवाज सरकार ऐकत नाही. संसदेत विरोधकांना बोलू दिलं जात नाही. देशात अनेक समस्या आहेत पण त्या सरकार ऐकून घेत नाही, द्वेष, हिंसा पसरवून भीतीच्या सावटाखाली जनतेला ठेवले जात आहे. स्वायत्त संस्थांवर सरकारचा दबाव आहे. न्यायपालिकाही यातून सुटलेल्या नाहीत अशा परिस्थितीत जनतेचा आवाज ऐकण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. दररोज हजारो लोक त्यांच्या व्यथा, वेदना, समस्या मांडत आहेत, त्यासाठीच ही पदयात्रा असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.

'शेतकऱ्यांचा आवाज ऐकला जात नाही'
शेतकरी आत्महत्यांसंदर्भात उत्तर देताना राहुलजी गांधी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या ही फक्त विदर्भातील समस्या नाही तर देशभरातील शेतकऱ्यांची समस्या आहे. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या या बळीराजाला आधार देण्याची, मदत करण्याची, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचं रक्षण करणं सरकारची जबाबदारी आहे. युपीए सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती पण आता केंद्रातील भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही, त्यांना मदत देणे तर दुरची बाब आहे. तरुणांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. 

'तरुणांचं भविष्य अंधकारमय'
तरुण मुलं मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षणावर खर्चही जास्त होत आहे पण इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपण इंजिनिअर होऊच याची खात्री नाही. नोकऱ्या नाहीत त्यामुळे तरुणांचं भविष्य, त्यांची स्वप्ने अंधकारमय झाली आहेत. या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे असेही राहुलजी म्हणाले.