बीड : पहिला पाऊस झाला. या पावसाचे पाणी जेव्हा शहराजवळच्या करपरा नदीत पोहचलं तेव्हा या पाण्यापासून फेस तयार झाला. या नदीपात्रातल्या पाण्यावर फेस कसा तयार झाला याबाबत गूढ निर्माण झाले आहे. करपरा नदी ही हिमनदी नाही. नदीत पसरलेला हा बर्फही नाही आणि ही नदी हिमालयातलीही नाही. ही नदी आहे बीडमधील. बीडमधील करपरा नदीपात्रावर पांढरा शुभ्र फेसाचा थर पाहायला मिळाला. हा थर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. या फेसाला उग्र वास येत होता. हा फेस तयार झाला कसा याबाबत नागरिकांनाही काहीही माहिती नाही.
बीड शहरातलं नाल्याचं पाणी आणि शेतांमधील खतांचा बेसुमार वापर यामुळं करपरा नदीचं पाणी प्रदूषित झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणंणं आहे. हा फेस त्याचाच परिपाक असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. याबाबत पर्यावरण तज्ज्ञ विवेक मिरगणे यांनी प्रदूषण असल्याचे म्हटले आहे.
तीन वर्षांपूर्वी देखील अशाच पद्धतीने करपरा नदीपात्रावर फेस आला होता.त्याची दखल प्रशासनाने घेतली नव्हती. आता तरी प्रशासन त्याची दखल घेणार का, असा प्रश्न बीडमधील नागरिकांनी उपस्थित केला आहे.