विष्णू बुरगे, झी २४ तास, मुंबई : बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, त्या अनुषंगाने रुग्णसंख्येला आळा बसावा या करीता बीड जिल्ह्यामध्ये दहा दिवसाचा लॉकडाउन करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाचं काम आरोग्ययंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहेत. याचा आढावा खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी घेतला. यासाठी ते थेट हॉस्पिटलमध्ये पीपीई किट घालून पोहोचले. जिल्हाधिकारी लुनावाडामध्ये पोहोचले आणि तेथील रुग्णांशी संवाद साधला.
जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवसाला तीनशेहून अधिक नवे कोरना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र योग्य नियोजन व्हावं, यासाठी थेट कोरोना वार्डमध्ये जाऊन रवींद्र जगताप यांनी रुग्णांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी एक कोविड सेंटर सुरू करण्यात आलेला आहे.
यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील वीस दिवसांपासून 100 हून अधिक रोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून कुठलीही यंत्रणा कमी पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
रुग्णसंख्या ज्या प्रमाणावर वाढत आहे. ते पाहून प्रशासन खाटांची व्यवस्था करत असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सांगितलं, यांची त्यांनी थेट कोरोना वार्डचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पीपीई किट चांगल्या दर्जाच्या द्याव्यात, अशी मागणी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. आठ तास ड्यूटी करण्यासाठी जी पीपीई किट दिली जाते, ती अडचणीची ठरत आहे त्यामुळे चांगल्या दर्जाची पीपी किट उपलब्ध करून देण्याची मागणीही काही डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.