वैभव बालकुंदे, झी मीडिया, बीड : NEET घोटाळ्याची राज्यातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढायला लागलीय. लातूरनंतर आता याचे धागेदोरे बीडपर्यंत (BEED) पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणी माजलगावमधल्या 7 शिक्षकांची चौकशी झाल्याची माहिती मिळतेय. ज्या शिक्षकांची मुलं लातूरला NEETच्या तयारीसाठी येत होती त्याच मुलांना आणि पालकांना आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव हेरत असल्याचं समजतंय. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती ही संपूर्ण मराठवाड्यात (Marathwada) पसरली असण्याची शक्यता वर्तवली जातेय..
NEET घोटाळ्याचं लोण बीडपर्यंत
आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण विद्यार्थी-पालकांना हेरत होते. ज्या शिक्षकांची मुलं NEET ची तयारी करताहेत अशांना हेरलं जायचं. 7 शिक्षक आरोपींच्या सापळ्यात अडकल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. या शिक्षकांकडून 4 ते 5 लाख रु. उकळल्याचं समजतंय. आरोपींनी 550 पेक्षा अधिक गुण वाढवण्याचं आमीष दाखवलं होतं. मात्र पैसे घेऊनही मुलांना 550 पेक्षा अधिक गुण मिळाले नाहीत. विद्यार्थी - पालकांनी फसवणूक झाल्याचा जबाब दिलाय
दुसरीकडे अटकेत असलेला आरोपी शिक्षक जलील खान पठाणचं निलंबन करण्यात आलंय. आरोपी शिक्षक संजय जाधव आणि जलील पठाणच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आलेत.
NEET घोटाळ्याची व्याप्ती वाढली
जलील पठाणच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आली आहे. पठाणकडे बोगस अपंग प्रमाणपत्र आढळलंय. बोगस अपंग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय आहे. संजय जाधवने त्याच्या शेतात 30 लाखांचा गाळ टाकल्याचं समोर आलं. बीडच्या नेकनुर भागातील 7 शिक्षकांनी पठाणच्या पत्नीच्या खात्यात पैसे पाठवल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान नीट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव उमरग्याचा आयटीआय सुपरवायझर इरण्णा कोनगलवार पत्नीसह फरार झालाय. नांदेडच्या एटीएसने पहिल्या दिवशी चौकशी करून कोनगलवारला सोडून दिलं होतं. तेव्हापासून तो फरार झालाय..
NEET घोटाळ्याचा सूत्रधार फरार
इरण्णा कोनगलवार पत्नीसह फरार आहे. संजय जाधव आणि जलील पठाणकडून मिळणारे पैसे कोनगलवार दिल्लीतील गंगाधरला पाठवत होता. दिल्लीतील एजंट गंगाधर हे पैसे डेहराडूनला पाठवत असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दिल्लीतील एजंट गंगाधरही फरार झालाय. त्याच्या शोधासाठी नांदेड एटीएस आणि लातूर पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना झालंय.
NEET घोटाळ्यातील आरोपींबाबात धक्कादायक माहिती समोर येतंय. तपास यंत्रणांनी आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरूवात केलीय. मात्र मेडिकल प्रवेशाचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?.. ज्यांचा प्रवेश दोन पाच गुणांनी हुकलाय अशा विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण ? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे....