मुंबई : मुंबईपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही होळी आणि रंगपंचमी खेळण्यास मनाई (Ban on Holi celebration) करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे.
मुंबईप्रमाणेच (Mumbai corona) पुण्यातही कोरोनाचा ( Pune Corona ) प्रादुर्भाव वाढू लागला आहे. होळी आणि रंगपंचमीला लोकांनी एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉटेल परिसर, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक-खाजगी मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्थामधील मोकळ्या जागा, रिसॉर्ट अशाप्रकारच्या कोणत्याही ठिकाणी होळी आणि धुलिवंदन साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पुणे हे कधीकाळी देशातील सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं. त्यानंतर तिथली कोरोनाची स्थिती निवळली. इतकी की कोविड सेंटरही बंद करण्यात आलेले. मात्र आता पुन्हा पुण्यात कोरोना डोकं वर काढू लागला आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद ३ हजारावर होऊ लागली आहे.
देशातील अनेक राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही राज्यांना पत्राद्वारे सांगितलेले आहे की स्थानिक स्तरावर जिथे-जिथे गरज आहे तिथे सणांनिमित्त निर्बंध घाला. होळी, ईद, शब-ए-बारात, ईस्टरसारखे सण आता काही दिवसांवर आले आहेत. त्यानिमित्ताने हे आदेश देण्यात आले आहेत.