७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ महत्वाचा- बच्चू कडू

भारत बंद यशस्वी करण्याची हाक....   

Updated: Dec 7, 2020, 01:19 PM IST
७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ महत्वाचा- बच्चू कडू title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : केंद्राने केलेल्या कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दिल्लीत येणारे सर्व रस्ते हे पंजाब हरियाणा तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी अडवून धरले आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे शेतकरी थंडीचा सामना करत दिल्लीच्या रस्त्यावर आहेत त्यामुळे त्यांनी ८ तारखेला भारत बंदचं आव्हान केलं आहे. या भारत बंदला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी करण्याचे आवाहन केलं आहे.

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच केली असून त्यांचा मोटारसायकल मोर्चा आज मध्यप्रदेशच्या भोपाळ वरून वरून रवाना होणार आहे. बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

 

माध्यप्रदेशाची सीमा ओलांडताच झाला होता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न....

बच्चू कडू हे शुक्रवारपासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. चार दिवसांआधी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे पहिला मुक्काम झाल्यानंतर परवा हजारो शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश मध्ये प्रवेश केला आहे. परवा या शेतकऱ्यांचा मध्यप्रदेश मधील बैतुल मध्ये दुसरा मुक्काम होता. यासाठी बैतुल मध्ये एक मंगल कार्यलय बुक करण्यात आले होते पण एन वेळेवर मध्यप्रदेश पोलिसांनी रहायला नकार दिल्याने हजारो शेतकरी हे शेतकऱ्यांचा शेतमाल असलेल्या वेअर हाऊस वर शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली.