औंरगाबाद : कचरा प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलंय. मिटमिटा परिसरात महापालिकेच्या गाड्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झालेत. जमाव पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.
महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात कचरा टाकण्यासाठी जागा पाहायला आले होते. यावेळी नागरिकांनी तीव्र विरोध केला. नागरिकांनी महापालिकेच्या पथकाला आणि पोलिसांना विरोध केला. नागरिक थेट पोलिसांच्या अंगावर धावून गेले. इतकेच नाही तर पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीमार केला. त्यानंतर याठिकाणी मोठा राडा पाहायला मिळाला.
तर दुसरीकडे कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेन सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र, या सभेला ११५ पैकी केवळ १५ नगरसेवकांनी या सभेला हजेरी लावली. नगरसेवक कचऱ्याबाबत गंभीर नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बैठक बोलावूनही नगरसेवक का येत नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.