विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : शाळा सुरू व्हायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुऴं पुस्तक, शाळेची कपडे घेण्यासाठी पालकांची लगबग सुरु आहे, मात्र काही शाळांच्या खरेदी सक्तीने पालक वैतागले आहेत. काही शाळांमध्ये तर पुस्तक फक्त शाळेतूनच खरेदी करा असा नियम लावला गेला आहे.
तर काही ठिकाणी विशीष्ट दुकानांची यादी देवून त्याच दुकानातून खरेदीची सक्ती केली जातेय. याला अनेक पालकांचा याला विरोध आहे, तर अनेकजण नाईलाजाने हे सहन करताय.
औरंगाबादमध्ये पुस्तकं, शाळेचा गणवेश याची खरेदी करण्यासाठी सक्ती सुरु असल्याचं चित्र पहायला मिळतंय. काही शाळांनी तर शाळेतच या सगळ्यांची विक्री सुरु केली आहे. शाळेतूनच पुस्तक, गणवेश अगदी शूज सुद्धा खरेदी करावे लागतील याची शाळांनी पालकांना सक्ती केलीय.
शाळेतून खरेदी करायचे नसेल तर शाळेत प्रवेशही नको असं शाळा पालकांना सांगत आहेत. तर काही ठिकाणी शाळांनी विशीष्ट दुकानातूनच खरेदी करावी असं सांगितलं आहे. शाळेत मिळणारी पुस्तक बाहेर कुठंही मिळत नाही त्यामुळं पालकांचा नाईलाज आहे, तर विशीष्ट दुकान सांगतिलं तर ती पुस्तक तिथंच मिळतात इतर कुठही नाही अशी अवस्था आहे. या सगळ्यामुळं पालकही वैतागले आहे..
पुस्तक शाळेतून घेतली नाही त्याला विरोध केला, तर मुलांचा त्रास देत असलयाचा अनुभव एका पालकाने सांगितला, मुलगा घरी येवून रडायला लागला त्यामुळं नाईलाजानं गेल्यावर्षी पुस्तक घ्यावी लागली याही वर्षी घ्यावीच लागेल असं पालक सांगताय.. नियमान असं करता येत नाही मात्र तरीसुद्धा शालेय लूट सुरुच असल्याचं पालक सांगतात.
औरंगाबाद जिल्ह्यात 2500 खाजगी शाळा आहेत, मात्र यातून या खरेदी सक्ती बाबत तक्रारी अवघ्या दोन ते तिन येतात. त्यामुळं तक्रारी केल्या तरच कारवाई केली जाते, असे शिक्षणाधिकारी सांगताय..
ही पालकांची लूट असली तरी याला वालीच कुणी नाही, मुलांना त्रास होवू नये म्हणून पालक सहन करतात, जी लोक तक्रार करतात त्यांच्या पाल्यांना त्रास होतो म्हणून पुढं तेही गप्प बसतात. तक्रार येत नाही म्हणून शिक्षण विभागही कारवाई करत नाही आणि म्हणून ही लूट सर्रास सुरु आहे.