औरंगाबाद : औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.
आतापर्यंत जिथं कचरा टाकला जायचा, त्या नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केलाय. योग्य प्रक्रिया न करता कचरा टाकला जात असल्यानं स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय, असा त्यांचा आक्षेप आहे.
महापालिकेनं बाभूळगावला पर्यायी जागेवर कचरा टाकण्याचं ठरवल्यानंतर तिथल्या नागरिकांनीही कचरा टाकू न देण्याचा इशारा दिलाय. त्यातच पैठणचे आमदार सांदिपान भुमरे यांनीही या वादात उडी घेतलीय.
आपल्या मतदारसंघात कचरा डेपो होऊ देणार नाही, असं त्यांनी बजावलंय. त्यामुळं रोजचा ४०० टन कचरा टाकायचा कुठं, असा गंभीर पेच महापालिकेपुढं उभा राहिलाय.