रविंद्र कांबळी, झी २४ तास, सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असताना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने विभागाने मोठी कारवाई केली आहे. खानापूर तालुक्यातील दिघंची येथे पुण्यातील दोघांना पाच देशी बनावटीचे पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे तसंच पाच मॅगझीन अशा साधनसामग्रीसहीत रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपींनी ही हत्यारं विक्रीसाठी इथं आणली होती. त्यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये 'आर्म ऍक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आटपाडी विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे यांना याबाबत माहिती मिळाली. पुण्यातील दोन इसम गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी दिघंची येथे आले आहेत, असं त्यांना समजलं.
माहिती मिळताच पथकातील कर्मचाऱ्यांनी आटपाडी ते नाझरे रोडवर सापळा लावला. पुण्यातील देवा उर्फ देवेंद्र सांगावे आणि बाला उर्फ बालाजी अदाटे हे एर्टिगा गाडीतून जात असताना त्यांना शिताफीने पकडून त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी या आरोपींकडे पाच गावठी पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे आणि पाच मॅगझिन्स आढळली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी दिघंची येथे हे पिस्तुल विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून एकूण ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्यारं सापडल्याने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.