प्रताप नाईक, झी २४ तास, कराड, सातारा : सातारा जिल्ह्यातल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत पहायला मिळणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात भाजपाकडून विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी कडवं आव्हान उभं केलं आहे. आपली लढाई ही जातीयवादी पक्षाविरुद्ध असल्याचं सांगत पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपाला थेट लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. २०१४ ला पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आताही कराडची जनता फसव्या आणि जातीयवादी पक्षाला थारा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच घेरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रणनिती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांना पुरेपूर ताकद पुरवण्यात आली आहे.
या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व गेल्या ४० वर्षांपासून करणारे आणि गेल्या निवडणुकीतले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर हेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे इथे तिरंगी लढत रंगणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांची क्लीन इमेज ही त्यांची जमेची बाजू आहे तर भाजपाही हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सरसावली आहे. दक्षिण कराडकर यापैंकी नेमका कोणाला कौल देतात? हे २४ ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.