योगेश खरे-अमित जोशी, झी २४ तास, जळगाव : राष्ट्रीय राजकारणात जे अडवाणींचं झालं, तेच एकनाथ खडसेंचं राज्यात झालंय. भाजपाचे नाथाभाऊ रिटायर्ड झालेत. या निमित्तानं गेल्या जवळपास पन्नास-साठ वर्षांचा काळ झरझर अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. भाजपाचे नाथाभाऊ... फर्डा वक्ता, उत्तम प्रशासक, विधिमंडळ गाजवणारा पक्षनेता... एकेकाळी तिकीट वाटप ज्यांच्या होकाराशिवाय व्हायचं नाही, युती तोडण्याची जबाबदारीही ज्याच्यावर सोपवण्यात आली... असा नेता... नाथाभाऊ रिटायर्ड होत आहेत. भाजपानं त्यांना सीआरएस अर्थात सक्तीची निवृत्ती दिलीय. खडसेंनाही हा निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता.
भ्रष्टाचाराचे आरोप... सातत्यानं पक्षविरोधी भूमिका... पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्यं... थेट मुख्यमंत्र्यांवर टीका... त्यामुळे पक्षाला डोईजड झालेले खडसे... खडसेंचं वय आणि प्रकृती पाहता मुक्ताईनगर मतदारसंघात नवीन माणूस तयार करणं ही पक्षाची गरज होती.. म्हणूनच मुक्ताईनगरमधून खडसेंची मुलगी आता रोहणी खडसे लढणार आहेत.
- विरोधी पक्षनेते
- सहा वेळा सलग आमदार
- प्रशासनाची खडान खडा माहिती
- राज्यातल्या प्रश्नांची उत्तम जाण आणि
- ते प्रश्न हाताळण्याची हातोटी
- पक्षबांधणीत महत्त्वाचं योगदान
- विधिमंडळातली वादळी तीस वर्षं
- विरोधकांना घाम फोडणारा झुंजार नेता अशा गुणगौरवानं खडसेंचा निरोप समारंभ होईल.
अर्ज आधीच भरुन टाकणाऱ्या खडसेंना आता अर्ज मागे घ्यावा लागेल. रक्षा आणि रोहिणी या खडसेंच्या नव्या वारसदार ठरतील. खडसेंच्याच भाषेत सांगायचं झालं तर कालाय तस्मै नमः याला पर्याय नाही.