'तावडेंनी इथे नाक खुपसण्यापेक्षा भाजपातील बंडाळीकडे लक्ष द्या'

 विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. 

Updated: Sep 25, 2019, 10:21 AM IST
'तावडेंनी इथे नाक खुपसण्यापेक्षा भाजपातील बंडाळीकडे लक्ष द्या' title=

मुंबई : मी निवडणूक लढवावी की नाही, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत विनोद तावडेंच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा सल्ला भाजपा नेते विनोद तावडे यांनी केले होते. या पार्श्वभुमीवर अशोक चव्हाण यांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. 

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण माझ्याविरोधात त्यांना निष्ठावंत मिळत नाही आणि उमेदवार आयात करावा लागतो, याची तावडेंनी अधिक काळजी केली पाहिजे. माझ्याविरूद्ध निष्ठावंत सोडून आयात उमेदवार देणाऱ्या भाजपने फुकटचा सल्ला देऊ नये असेही चव्हाण यांनी यावेळी म्हटले.

विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या प्रश्नामध्ये नाक खुपसण्यापेक्षा भाजपमध्ये होणाऱ्या बंडाळीवर लक्ष दिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधी पक्षांनी निवडणूक लढवू नये, असे सांगणारे हे सरकार लोकशाहीचा अवमान करीत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.